मंगळवार, २२ मार्च, २०१६

मा. राजेंद्रसिंह

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ मा. राजेंद्रसिंह यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचा दौरा केला. या आधी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात त्यांनी एक दौरा केला होता. दोन्ही वेळेला राजेंद्रसिंह यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना दुष्काळ या विषयाभोवती बोलत असताना ते म्हणटले की ऊसशेती बंद करून त्याजागी ज्वारी, हरभरा, तूर, मूग, ऊडीद, सोयाबीन इत्यादी कडधान्ये आणि डाळींची पिके घेतली तर पाणी वाचेल. असा सल्ला त्यांनी सोलापूरात दिला. एकदा नव्हे तर दोन वेळा. त्यामूळे त्याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते. 
राजेंद्रसिंहांचे पाण्याबद्दलचे काम उत्कृष्ट आहे, त्याबद्दल ना नाही. त्यांचा त्याबद्दल अनेक ठिकाणी गौरवही झालाय. गेल्यावर्षी पाण्याचा नोबेल समजल्या जाणार्या स्टाॅकहोम वाॅटर प्राईज या पुरस्काराने त्यांना गौरविण्यातही आलंय. त्याबद्दल त्यांचा आदर आहेच.
आता ते इतके महत्वाचे व्यक्ती असल्याने त्यांचं विधान गांभिर्याने घेतलं पाहीजे. 
सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्रातला जिल्हा. पावसाच्या बाबतीत सोलापूरचा विचार केला तर जेमतेम पाऊस असतो. त्यामूळे तिथे कोरडवाहू शेती केली जात होती. आत्ता अलिकडे ऊसाचं प्रमाण वाढलं आणि आजरोजी महाराष्ट्रातला सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख झाली. सर्वप्रथम शेतकरी ऊसपिकाकडे का वळला ? हे बघू. 
गेले चारपाच वर्ष ऊसाला पंधराशे ते दोन हजार रूपये इतका भाव प्रतिटन मिळालाय. एकरी किमान निगा केली नाही तरी साधारण चाळीस टन उतारा पडतो आहे. साधारण वर्षाकाठी सत्तर ऐंशी हजार रूपये येतात. खर्च वजा जाता किमान तीस हजार पर्यंत एकरी पैसे शेतकर्याला एकगठ्ठा मिळतात. शिवाय ऊस लागणीच्या वेळी जे काही मनुष्यबळ लागेल तितकेच. रोजचे मनुष्यबळ लागत नाही. शिवाय इतर पिकांच्या तुलनेत कीडीचा प्रादुर्भाव किंवा रोगराई ऊसपिकाला कमी. वर्षभरात किरकोळ फवारणी सोडल्यास कोणतीच दूसरी औषधाची तरतूद करावी लागत नाही. घरातल्या जनावरांसाठी वैरण मिळते, ऊसाचा पाला किंवा कोंबर्या (फूटवा) यावर वैरणीची व्यवस्था होते. तसेच ऊस शेतात लावण केली असता दोन तीन महिन्यात एखादे आंतरपिकही त्याच पाण्यावर निघते. या गोष्टी लक्षात घेतल्या तर ऊसशेतीचे फायदे लक्षात येतात. हीच कारणे यासाठी पूरक आहेत. 
आता राजेंद्रसिंहाच्या म्हणन्यानुसार बघितलं तर कडधान्य आणि डाळीची पिकं यांची ऊसाशी तुलना केली तर काय दिसते. ? 
डाळी अथवा कडधान्य ही पावसाच्या पाण्यावर येतात किरकोळ एकदोन पाळ्या वगळल्या तर त्यास इतर कुठलेच पाणी लागत नाही. 
मात्र यावर रोगराईचा प्रादूर्भाव मोठ्ठा आहे. जर अवकाळी पाऊस झाला तर अख्खं पिक खाण्याच्या लायकीचं राहत नाही. अनेक अळ्या, रोग, बूरशी यांचा सामना करावा लागतो. ते झालं तर अवकाळी पावसातंन वाचावं लागतं. बरं ते सगळं जरी झालं तरी उत्पादन एकरी किती होतं ? त्याचे भाव काय ? हे प्रश्न आहेत. 
गेल्यावर्षीचे काही बाजारभाव.
तूर 4500
उडीद 4800
सोयाबीन 3500
ज्वारी 2500
(हे प्रतिक्विंटल भाव आहेत.)
सरासरी डाळीच्या पिकाच उत्पादन 4 ते 5 क्विंटल होतं. एकूण एकरी उत्तपन बघितलं तर पंचवीस हजाराच्या आसपासही जात नाही. त्यात खर्च वजा घातला तर काहीच ऊरत नाही. 
गेल्यावर्षी देशांतर्गत तूरीचं उत्पादन कमी झालं आणि भाव कडाडले. मात्र शेतकर्याकडे तूर होती का ? (हा वेगळा विषय. तूर्तास दुर्लक्ष करू) . हे दर खूप दिवस टिकले का ? तर नाही. याच महिन्यात केंद्रसरकारने आठलाख टन इतकं डाळ आयात केलेली आहे.
शेतकरी लागेल इतके धान्य पिकवत असतोच. 
हे सर्व आर्थिक दृष्टीतंन झालं.
आता पाण्याबद्दल बघू. 
ऊसाची आडसाली लावन ही डिसेंबर ते मार्च या काळात होते. ज्या शेतकर्यांकडे पाणी कमी असतं ते जून जुलै मध्ये मिरगी लावन करतात. आणि त्यापुढच्या हंगामात घालवतात. आपल्याकडे पाऊसकाळ हा मे चा शेवट आठवडा ते नोव्हेंबर पर्यंत असतो. या काळात ऊसाला दूसरं कोणतं पाणी द्यावं लागत नाही. इतर पिकाप्रमाणे हेही वाढतं त्यात. त्यानंतर विहीरी बोरिंगला चारेक महिने पाणी असतं. त्यावर पाण्याच्या पाळ्याचा प्रश्न भागतो. नंतरच्या दोन ते तीन महिन्याचा मुख्य प्रश्न असतो. तिथे रोज तास अर्धातास करत आठपंधरा दिवसात पाणी दिलं जातं. ते खरतर नाममात्र. म्हणजे पिक जगलं पाहीजे हा उद्देश असतो. आता हेच पाणी साठवायचं ठरवल तर ? ते शक्य आहे का ? पावसाळ्यात विहीरी तूडूंब भरलेल्या असतात पण कालांतरानं आपोआप उपसा न करताही कमी होतंय. तिथं उन्हाळ्यात साठपा करायच्या कल्पनेचं निव्वळ हसू येतं. जर बघायचच झालं तर जलयुक्त शिवारची आजची अवस्था बघितली तरी हे समजून घ्यायला पूरेसं आहे. 
या सर्व गोष्टींचा विचार एकत्रीतपणे केला तर राजेंद्रसिंहाना वाटणारी कल्पना किती खोटी आहे हे लक्षात येते. त्यांना ऊसाबद्दलच असे वाटणे गैर आहे. मुदलात ते राज्यशासनाला मात्र काही सूनावत नाही. शेतकर्यांच्या अडचणी ध्यानात घेत नाहीत. मात्र ऊसशेती बंद पाडून शेतकरी, कारखानदार, कामगार, ऊसतोडमजूर आणि साखर उद्योगावर अवलंबून असणार्या असंख्य लोकांचा विचार न करता अनाहूत सल्ल्यांच्या पिचकार्या मारणं त्यांच्या ख्यातीला शोभतंय तरी काय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा