मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

थोडं कोल्हापूर विधानपरिषदेबद्दल.....

थोडं कोल्हापूर विधानपरिषदेबद्दल.....
अकरावर्षामागे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे कै. दिग्विजय खानविलकर आरोग्यमंत्री होते. जिल्ह्याची बरीच सुत्रं ही महाडिकांकडे असत गोकुळ असो कि केडीडीसी बँक किंवा विधानसभा लोकसभा. खानविलकर लोकप्रिय होते, आरोग्यमंत्री असताना शासकीय हाॅस्पीटलांचा दर्जा सुधारण्याचं काम त्यांनी केलंत. अगदी सीपीआर देखील त्याकाळात त्यांनी बरंच आधूनिक केलतं. एकंदरीत त्यांचा प्रभाव वाढत होता त्यावेळी महाडिक आणि इतर काहीजणांनी त्यांच्याविरोधात बंटी पाटलाना बंडखोरी अर्थात अपक्ष मॅनेज करून बरंच पाठबळ देवून निवडूण दिलतं. त्याप्रसंगी पवारसाहेबांनी सांगितलं होतं असं करू नका पण केलंच. बंटी पाटील सुद्धा धडाडीचे. निवडूण आले बरीच कामं केली. दूसर्या टर्म ला परत निवडून आले. ते थेट गृहराज्यमंत्री झाले. पद्मश्री डी.वाय पाटलांचे ते चिरंजीव. दरम्यानच्या काळात महाडिकांचा त्यांनी पराभव केलता जे आज खासदार आहेत त्यांचा. बंटी विरूद्ध मुन्ना महाडिक हे समिकरण रूळलं. कार्यकर्ते दोघांचेही कट्टर.
सलग सत्तेचा सूकाळ आला कि माणूस बिघडतो. बंटी पाटील मंत्री झाले आणि स्थान मजबूत करत असतानाचं स्थानिक राजकारणात अगदी गावलेवलला सुद्धा अतिलक्ष घातलं त्यामुळं बरेच कार्यकर्ते दूरावले होते. कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर नेहमीच महाडिकांच्या मर्जीतला असायचा पण तिथंही बंटी पाटीलंच चमकले सलग दोनदा तिथला महाडीक प्रभाव झाकण्यात ते यशस्वी झाले. यात महाडिकांचा इगो हर्ट झाला. पण पुढे लोकसभा होती कागलचे सध्याचे आमदार आणि तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकरवी सतेज पाटलांचा पाठिंबा मिळवण्यात महाडिक यशस्वी झाले. महाडिकानी डाव साधला धनंजय खासदार झाले. बंटींचे आभारही मानले. अर्थातंच हे मिशन इमपाॅसिबल होतं. मोदीलाटेत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडूण येणं ही सहजसोपी गोष्ट नव्हती. पण ते बर्याच गोष्टीनी शक्य झालं, त्यात बंटी होते ही मोठी गोष्ट.
*************
तितक्यातंच विधानसभा वाजली. आता पैरा फेडायची पाळी महाडिकांची होती. पण ऐन वेळेला महाडिकांनी दगा केला आणि बंटी पाटीलांच्या विरूद्ध महादेवरावांचा पुत्र अंमल महाडिक हे भाजपाच्या तिकटावर
बंटी पाटलांविरूद्ध उतरले. त्यातंच मोदींची प्रचारसभा कोल्हापूरात झाली. आज जे लोक पैशाची गणितं मांडताहेत त्यांनी आवर्जून वर्षामागंचा काळ आठवावा. यातही महाडिक जिंकले. अंमल महाडिक हे आधीच जिल्हा परिषदेत होते. ती सिट रिकामी झाली, परत तिथल्याही पोटनिवडणुकीत अंमल यांच्याच पत्नी विजयी झाल्या.
आत्ता बघितलं तर महाडिकांच्या घरी पदे किती ???
एक खासदार (राष्ट्रवादी)
एक आमदार (भाजप)
एक आमदार (काँग्रेस)
एक झेड. पी सदस्य(काँग्रेस)
इतकी पद आणि राज्यातली मोठ्ठी दूधसंस्था गोकुळ ताब्यात.
सर्वत्र बंटी पाटील हरलेले. राजकारण एककल्ली वळणावर आलतं. पण वेळोवेळी विश्वासघात झालता पक्षाचा. अनेक लोकांचा. त्यातंच परवा कोल्हापूर मनपा ची ईलेक्शन त्यावेळी ही महाडिकांनी भाजपला जवळ केलं. एका बंटी पाटलानी काँग्रेसचा गड सांभाळला. अर्थात इथंच त्यांनी आजची गणितं आखली होती. मुश्रीफांनीही त्यांच्याशी युती करून पक्ष पैरा फेडला.
ती निवडणुक होते न होते तोच विधानपरिषदेच बिगूल वाजलं. ऊमेदवारी कुणाला यावर बराच खल झाला. यात पी.एन.पाटील, प्रकाश आवाडे इ होते. राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील यड्रावकर होते.
बंटीना तिकीट फायनल झालं. पक्षश्रेष्ठीनी कार्याची पोचपावती दिली. ईकडं महाडिक बंडखोर झाले, भाजप आणि सेना सोबतीला होती. अर्ज माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीचे यड्रावकरांची मुश्रीफानी समजूत काढली आणि माघार घेतली. महादेवराव तिथंच होते पण त्यांनी मुश्रीफांकडे ढुंकूनही पाहिलं नाही परिणामी मुश्रीफ यांनी बंटीना पाठिंबा दिला इथेच निम्मे फासे फिरले होते. बरीच आर्थिक उलाढाल अपेक्षेप्रमाणे झाली. आणि कोल्हापूरात 100% मतदान झालं. ज्यावेळी मतदान प्रमाणापेक्षा जास्त होतं त्यावेळी प्रस्थापिताला धोका होतो. नेमकं तेच झालं आणि आज बंटी विजयी झाले.
कितीही आर्थिक उलाढाल झाली तरी राजकारण हे राजकारणंच डाव साधता आलं पाहिजे. आणि हे कोल्हापूर आहे.

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

हिंसा.....

हिंसा.....
शुन्यात नजर ठेवून गेलेल्या काळाचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी नजर खोलात जावून अगदी प्राचीन काळात जाते. ज्यावेळी माणूस अप्रगत होता. त्यावेळी त्याचं जीवन, खाणं, पिणं, जगनं कसं असेल ? असे बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. सुरवातीला माणूस खाण्यासाठी मांस आणि कंदमुळे यावरच अवलंबून होता हे नाकारून चालणार नाही. तत्कालीन चित्रं, फाॅसिल्स, शिल्प यावरून ते स्पष्ट होतं.
आता मुद्दा असा आहे की, त्याकाळात संपुर्ण मानवजात ही मांसाहार करत /घेत होती. साहजिकच मांसाहार हे चटकदार असतं. त्याची सवय मोडणे कठिण काम. पण त्याकाळात शाकाहार किंवा अहिंसा ही मुल्यं रूजवनं तितकं सोप्पं काम होतं का ?
पंचेंद्रिय असलेल्या प्राण्यांबाबत सहानुभूती, निर्माण करणे ही त्याकाळातली भलीमोठी क्रांतिच मानावी लागेल. बुद्ध, भगवान महावीर यांनी त्या काळात मांडलेला विचार आजही पूजनीय आहे.
अगदी अलिकडंच पहायला गेलं तर या शेदोनशे वर्षातला मोठा माणूस जर कोण असेल तर तो महात्मा गांधी. आजही जगाच्या कानाकोपर्यात पूतळ्यांची अनावरनं होताहेत, नोटावर गांधी अशा ठिकाणी ते अढळ आहेत. अहिंसा हे मूल्य त्यांनी जपलं, पोसलं, वृद्धिंगत केलं.
त्यांच्या हत्येनंतर काय झालं हे प्रत्यक्ष जगानं पाहिलंय. गांधींच्या हत्येनंतर झालेल्या हत्याकांडातील हत्यारे हे गांधीवादी असतील का ?
शोषक हिंसा, प्रतिकात्मक हिंसा, प्रत्युत्तरादाखल केलेली हिंसा हे प्रकार तुर्तास बाजूला ठेवू.
जन्मापासून माझ्या पिढीने ज्या ज्या गोष्टी ऐकल्या त्या गोष्टीत पराक्रम म्हणजेच दृष्टांचा नाश. हे आम्ही ऐकलं किंवा पाहिलं त्यातून आम्हाला स्फूरण चढून अंगावर काटे यायचे ही सत्यपरिस्थिती. कृष्णानं अर्जुनाला सांगितलं 'हा सुर्य हा जयद्रथ ऊडव त्याचे मुंडके',
किंवा छत्रपति शिवाजी महाराजांचं चरित्र वाचताना अफजलखानाचा वधच सारखा रिपीट वाचने.
किंवा 'देवधर्मापायी प्राण घेतलं हाती !' याच गोष्टीभोवती रेंगाळत बसने. हे होते. बर्याच जणांना याचा अनुभव आहे. अगदी अलिकडे व्हिलन नसलेल्या चित्रपटांची अवस्था काय असते ?
अन्यायाच्या कथा, पिळवणूकीचा राग, जन्मोजन्मीचा कपोकल्पित ईतिहास याचा मोठ्ठा पगडा आपल्या समाजावर आहे. आज जे काही आतिरेकी, दहशतवादी, धार्मीक, जातीय, ऑनर किलींग, वर्चस्ववादातून झालेल्या हत्या यांचा मागोवा घेतला तर काय दिसून येतं ?
शुद्ध मुर्खपणा, हतबुद्ध हतबल मानसिकता आणि अन्याय झालेली भावना यापलिकडे कोणतीच मानसिकता नाही.
राजकीय हत्या या अशा असतात की त्याचे हत्यारे कधीच सापडत नाहीत. त्या हत्या विरोधक आणि सत्ताधारी यांच्या संगनमतानेच झालेल्या असतात. त्यावेळी अगदी कितीही आधूनिकरित्या तपास घेतला तरी त्याचे हत्यारे सापडत नाहीत. किंवा शोधले जात नाहीतंच.
आजच्या घडीला या देशात रोज नवनविन हत्या घडत असतात. ब्रेकिंग न्युज येत असतात कुठल्या हत्या हत्याकांड ध्यानात ठेवायचं झालं तर ते ही तितक सोप्पं नाहीय. इतक्या प्रचंड वेगाने बातम्यांचा भडिमार होत आहे. अशा कोण कुठला पाठपूरावा करणार ? आणि ज्या त्या आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फासावर चढविणार ?
अलिकडं एकवेळ फास बरा पण पोलिसानी केलेला छळ नको अशी अवस्था आहे. कायदा हा सामान्य माणसाला पोलिसापासून वाचवण्यासाठी आहे, इतपत कायदा नजरेत आहे.
.... महात्म्याच्या जयंतीला हातात खराटा देवून अहिंसा पद्धतशीर लपविने, देशापरदेशात जावून भुरट्या स्वच्छतेची मोहिम आखून चकचकीत रोडवर झाडू मारण्याचा निर्ल्लजपणा ज्यावेळीस वाढायला लागतो त्यावेळी देशातला स्वंघोषित महात्मा (!) ही धोतराचा सोगा तोंडात घालून निपचित पडतो.
अहिंसेला षंढपणाचा प्रतिक करण्याचं काम षंढांकडून जोरदार चालू आहे. सावध असा

न अडकलेले लोकंच भारी वाटतात

कोण स्वर्ग, मोक्ष, नरक बघितलंय ? 
सभोवताली सगळ्या अशा फालतू गोष्टीत माणसं अडकलेली माणसं बघितली की माझी मला लाज वाटते. आणि हसायला पण येतंय ओ. त्याग, ब्रहमचारी, मनावर नियंत्रण अशा गोष्टीबद्दल माणसांच्या मनात घाऊक आदर आहे. का कुणास ठाऊक ? 
असावा नसावा याबद्दल काय सक्ती नाही पण त्या गोष्टींच काय ? 
समजा, आज मी म्हणटलो आजपास्नं फेसबुकवर येणार नाही आणि अकाऊंट डिएक्टीव्ह केलो. आज उद्या परवाही मला बरं वाटलं. पण कधीतर अशी वेळ येणारंच आहे की, मला परत फेसबुकवर येवूसं वाटणार आहे. मग त्यावेळी आपल्या मनाला दाबण्यात काय घंटा अर्थ आहे ?
आपन आपल्याला चौकटीत बंदीस्त करून घेणं म्हणजेच आत्महत्या करनं असं मला तर वाटतंय. कशाला बंधनं पायजेत ? आपला समाज का असं वागतोय. ? त्यांना शहाणं वगैरे करायला कुणीही जावू नका.
पण अशा लोकांच्या चेहर्यावर एक दुःख कायम असतं. ते त्या त्या मर्यादेत राहून कुबट झालेले असतात. त्यांच्या डोळ्यात कायम एक कुत्सित भाव असतो, त्यामुळं ते आत्ता एवढ्यातंच रडतीलं की काय अस वाटतं. एकनिष्ठ, त्याग, बंधनं, देव, स्वर्ग, नरक या गोष्टीत न अडकलेले लोकंच भारी वाटतात.