गुरुवार, ३ मार्च, २०१६

सर्वोच्च न्यायालयातले बैल !!!!!


काही दिवसांपुर्वी प्राणीमित्रांच्या दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आणि या आधी गोहत्याबंदी राज्यात आणली गेली. याप्रसंगी ह्यावर विचार करावयास हवा असे वाटते. 
बैलगाडी शर्यतीची परंपरा ही दोनशे वर्षापुर्वीची. बैल पाळणारे हे नव्वद टक्क्याहून अधिक लोक शेतकरी. सुरवातीला मनोरंजन अथवा क्रिडाप्रकार म्हणून या शर्यत्या प्रचलित झाल्या. वर्षाचे बारमाही काम काय बैलांचे नसते. शेतीची मशागत, नांगरणी, कुळवनी, पेरणी आणि शेतमालाची वाहतूक अथवा जिथे प्रवासाची काहीच साधने नाहीत अशा आडवळणी ठिकाणच्या प्रवासास बैलगाडी वाहतुक सुसह्य असायची. अलिकडे ही परिस्थिती बदलली. जी शेती बैलांवर अवलंबून होती तीपैकी साधारणतः नव्वद टक्के शेती ही यांत्रीकीकरणाखाली आली आणि बैल ह्या प्राण्याची उपयुक्तता हळूहळू कमी होवू लागली. हे सर्वांगसत्य मान्य करावयास कुणाची हरकत नसावी. 
आता जर भवतालची खेडीपाडी पाहिली तर जी मंडळी आज वयवर्षे तीस ते चाळीस ची आहेत त्यांना हे सहजी ध्यानात येईल. 
बैलगाडी शर्यत ही सुरवातीस प्रचलित झाल्यापासून त्यात नानाविध प्रकारे बैलांचा छळ होत होता. त्याचे प्रकार असे की, लाठीने मारणे, शेपूट पिरगाळणे ,चावणे, इलेक्ट्रीक करंट देणे, चटणी लावने मारणे, चाबूकहल्ला, मादक/उत्तेजीत पदार्थ पाजवणे इत्यादी. 
हे सर्व प्रकार निंदनीय तर आहेतच त्याहूनही क्रूरपणा यात भरला आहे. यास उत्तर देताना ते म्हणतात की हे जे असतंय ते शर्यतीपूरतं मर्यादीत असतं. 
परंतू हे उत्तर संयुक्तीक ठरत नाही. 
त्यानंतर गेल्या काही वर्षात कर्नाटकातील एकसंबा याठिकाणी विनाकाठी लाठी शर्यत्या घेतल्या जायच्या. त्या शर्यत्यांमध्ये देशातले अनेक स्पर्धक सहभागी सहभागी व्हायचे. प्रेक्षकांची गर्दी ध्यानात घेतली तर त्याठिकाणी लाखो प्रेक्षक जमायचे. अर्थात शर्यतप्रेमी कमी आहेत असेही नाही. हे यावरून स्पष्ट होते. त्याहून दूसरी गोष्ट ही महत्वाची दिसते की जो संवेदनशील मनुष्य आहे त्यास ही अशा विनाकाठीलाठी शर्यत्यावर आक्षेप असायचे काही कारण नसावे. ही शेवटी स्पर्धा खेळ आहे. यात मनोरंजन असते. 
आज या विषयाचा विचार करत असताना प्रकर्षाने हे जाणवते की ज्यात कुणावरही अन्याय होणार नसेल आणि त्यातून मनोरंजन जर होणार असेल तर त्यास कुणाचा विरोध असता कामा नये. पण काही 'अतिसंवेदनशील' प्राणीमित्रांच्या दृष्टीतून प्राण्यांवर अन्याय होत आहे. ते खरे आहे पण विनाकाठीलाठी या प्रकारात सुयोग्य नियोजन असेल तर काही अनुचित प्रकार रोखून 'निखळ' स्पर्धा घेण्यास ह्यांचा विरोध का असावा हे प्रश्न सुटत नाही. 
पाळीव प्राणी हे शेतकर्याला चांगले परिचीत हे प्राणीमित्र शेतकरी असतील याबाबत शंका आहे. 
जर विनाकाठीलाठी शर्यतीत बैलांवर अन्याय होत असेल तर याच न्यायीगणांनी ऊसवाहतूक करणार्या बैलांचे ओझे ऊचलावे. पंधरावीस किलोमीटर किंवा त्याहूनही अधिक अंतर टनांचे ओझे खांद्यावर वागवत बैल काय खुशीने जातो का ? चाबकाचे किती फटके पडतात ? याची कल्पना या प्राणीमित्रास अथवा बुद्धिमान न्यायीगणांना नसावी याचे भयंकर दुःख वाटते. या दोन गोष्टी जुळवून पाहिल्या की समोर काय येते ? 
मोठमोठ्या कारखानदाराना मालपूरवठा करण्यात बैल प्राण्यावर होणार्या अन्यायाकडे हे लोक दुर्लक्ष करतात पण शेतकर्याच्या विरंगुळ्यापायी त्यातही कोणतीही इजा न पोहचवता काही स्पर्धा घेता येतील तर त्यास परवानगी नाही. 
हा कुठला न्याय ? 
मुदलात प्राणीमित्रांची संवेदनशीलता कुत्र्यांची नसबंदी करताना कुठे जाते ? बैलाच्या मानेवर टनानी ओझे देवून चाबकाचे फटके देत ऊस वाहतूक करणार्या बैलांची कणव का येत नसावी ? 
चकचकीत जगात एसी गारव्यात रमल्यावर कर्तुत्वाची सर्टिफिकेट भिंतीवर लटकविण्यास आतुर असणारे कुठेही बेदम संवेदनशील होतात. समान न्याय देणार्या आंधळ्या न्यायदेवतेच्या पुजार्यांनी व्हीआयपी दर्शनाच्या पासची सुविधा चालु केली काय ? ही शंका उठते. 
एखाद्या विवादास्पद चित्रपटातले वाद असणारे तेवढेच दृष्य काढून टाकून प्रसारणाची परवानगी देते. तसेच या शर्यतीबद्दल काही नियम अटी लावून शर्यत्या सुरू करण्यास परवानगी द्यावी. 
नाहीतर दुर्दैवाने आम्हाला ज्या न्यायसंस्थेचा आदर आहे तिथे रिकामे बैल बसलेत असे म्हणावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा